कमलनयन बजाज रुग्णालयात बोन मॅरो ट्रान्सप्लांट आता मोफत

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : थॅलेसेमिया आणि गंभीर रक्तविकारग्रस्त मुलांसाठी जीवनरक्षक ’बोन मॅरो प्रत्यारोपण’ (बीएमटी) सुविधा उपलब्ध देण्यासाठी एमएमआरआय कमलनयन बजाज रुग्णालय व कोल इंडिया लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे मराठवाड्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार होणार आहेत. जवळपास अडीच हजार थॅलेसेमियाग्रस्त मुलांना याचा फायदा होईल, अशी माहिती बीएमटी कार्यक्रमाचे प्रमुख, उपचार तज्ज्ञ डॉ. वेंकटेश एकबोटे यांनी दिली.
ते म्हणाले, मराठवाड्यात १२ वर्षांखालील जवळपास तीन हजारांहून अधिक थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण आहेत. या रुग्णांना दर महिन्याला रक्ताची गरज भासते. त्यामुळे या रुग्णांवर बोन मॅरो प्रत्यारोपण करायचे असेल तर कुटुंबावर मोठा आर्थिक भार पडतो. 
पुणे, मुंबईमध्ये प्रत्यारोपणासाठी जवळपास २५ ते ३० लाख रुपये लागतात. परंतु आपल्या रुग्णालयामध्ये नऊ ते दहा लाखांत हे उपचार होतात. परंतु, आता नुकत्याच झालेल्या करारामुळे हा उपचार आता पूर्णपणे मोफत होणार आहे. यासाठीचा लागणारा खर्च कोल इंडिया लिमिटेड उचलणार आहे.